लोकशाहिरांच्या साहित्यातले लोकमान्य!

0
1353

आजचा दिवस म्हणजे १ ऑगस्ट २०२०, महाराष्ट्राच्या साहित्यासाठी आणि इतिहासासाठी हा दिवस खूप वेगळा आहे , आज लोकमान्य टिळक यांची १०० वि पुण्यतिथी (स्मृतिशताब्दी) तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  यांची १०० वी जयंती (जन्मशताब्दी), एक पत्रकार जहाल लेखक, गणितज्ञ, प्रखर राष्ट्रवादी, इंग्रजांनी ज्यांना भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला असे लोकमान्य तर दुसरे साहित्यरत्न लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन मध्ये ज्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले असे अण्णा भाऊ साठे, एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी.
लोकमान्य टिळकांनी गीतेचा सार असणारा गीतारहस्य नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला तर अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा नावाची कादंबरी लिहिली.
अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या ३ कवितांमध्ये लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केलाय

  • गण हा काव्यप्रकार
  • महाराष्ट्राची परंपरा
  • मुंबईचा गिरणी कामगार

याच निमित्याने अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचा गण या काव्यप्रकारात लोकमान्य टिळकांबद्दल त्यांचं महत्व सांगणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहे त्या या निमित्याने बघू या

प्रथम मायभूचा चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनी गातो कवणा ||धृ ||
स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना
लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना
कठीण काळी राष्ट्रनौकाना
मार्ग दाखविला तयाना
देशा दिली ज्यांनी प्रेरणा ||१||
–  अण्णा भाऊ साठे


वरील गण या काव्यप्रकारात अण्णा भाऊ साठे सर्वात पहिले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती यांचं स्मरण करून प्रथम मायभू चा चरणा,छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवणा म्हणजेच सर्वात पहिले मी माझी मायभूमी आणि छत्रपतींच्या शिवराय याना वंदन करतो आणि त्यांना स्मरण करून खालील गण सादर करतो .
त्यापुढील कडव्यात ते लोकमान्यांबद्दल लिहितात “स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना, लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना “ कि मी छंत्रपती शिवरायांनंतर अश्या व्यक्तीला स्मरण करतो ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून सर्वसामान्य लोकांना जागे केले जेणेकरून येथील लोक हे इंगरांविरोधात स्वराज्यासाठी एकत्र येतील, पुढे ते लिहितात कि “कठीण काळी राष्ट्रनौकाना, मार्ग दाखविला तयाना” या देशात जेव्हा इंग्रजविरोधात कठीण काळ होता दडपशाही होती तेव्हा येथील राष्ट्रनौकाना म्हणजेच सर्वसामान्य लोकांना स्वराज्य हा मार्ग लोकमान्य टिळक यांनी दाखविला आणि देशाला इंग्रजनविरोधात लढण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली अशा लोकमान्य टिळक याना मी वंदन करतो, हे आहेत लोकशाहीर म्हणवल्या जाणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे लोकमान्य टिळक यांचा बद्दल चे शब्द, आज आपण सर्व महापुरुषांची विभागणी करतो अश्या वेळी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली हि गण कविता बराच काही सांगून जाते, जिथे आज फक्त जात पाहून महापुरुषांची जयंती साजरी केल्या अश्या आजचा महाराष्ट्राला आज या दोन्ही महापुरुषांची गरज आहे.

दुसरी कविता आहे मुंबईचा गिरणीकामगार त्यात त्यांनी लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर जी स्तिथी झाली त्याविषयी अण्णा भाऊ साठे यांनी वर्णन केलाय ते बघूया


सन एकोणीसशे आठ साली | इंग्रजांनी भली |

अटक बघा केली | टिळकांना कारागृहीं नेले
मुंबईचा कामगार खवळे | निषेध संपाचे वादळ उठले |

हिंदच्या मुक्तीचे भले ||

यामध्ये १९०८ साली लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर मुंबईचे गिरणी कसे खवळले आणि पुढे संप पुकारून त्यांनी निषेध व्यक्त केला हे सांगितलं आहे.

अण्णाभाऊ तिसऱ्यांदा  एका पोवाड्यात  लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला आहे
पोवाड्याचा नाव आहे :- महाराष्ट्राची परंपरा, त्यात ते खालील प्रकारे उल्लेख करतात


टिळकांनी घालून साद सिंह उठवला
उन्मत्त गोऱ्या गजाला, निर्भय इशारा दिला||
पळ काळे कर लवलाही केसरी आला’ ॥

यात अण्णा भाऊ साठे टिळकांना सिंह म्हणतात आणि त्यांनी इंग्रजांना ना भिता केसरी मधून जे लेख लिहायचे त्याचा उल्लेख अण्णाभाऊ यांनी केलाय, अण्णाभाऊ यांचा काळ वेगळा, दृष्टिकोन वेगळा तरीही ते लोकमान्य टिळकांचा त्यांनी आपल्या कवितांमध्ये अश्या प्रकारे उल्लेख केलाय , माणूस कितीही मोठा झाला तरी इतर व्यक्तींबद्दल असलेला आदरभाव च अण्णाभाऊ साठे यांच्या वरील कवितांमध्ये दिसून येतो, आज यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती तर लोकमान्य टिळक यांची १०० वी पुण्यतिथी त्यानिमित्यानी अण्णा भाऊ साठे यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल लिहिलेय या ओळी, दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन


लेखक – प्रसाद पाचपांडे, अमरावती
ई-मेलprasadpachpande12@gmail.com 

***

(सदरच्या लेखामध्ये लिहिलेले विचार आणि लेखाविस्तार संपूर्णतः लेखकाचा वैयक्तिक असून, संपूर्ण अर्धाकप टीम त्यांच्या या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here