तर दोस्तांनो ह्या लॉकडाऊन मुळं, मुळव्याध व्हायची वेळ आली,
कुठं बाहेर जाता येत नाही, थिएटरमधे जाऊन पिक्चर बघता येत नाही,
एकाच ठिकाणी बुड टेकवून बसायचं.
पण आसं असलं म्हणून कुणाचं काय अडलंय का??
तर न्हाई कारण सगळे घरी बसून आपल्याला जुने नवीन सगळे चित्रपट बघता येतायत. कसं तर कुणी युट्युब वर हुडकीतय तर कुणी त्या टेलिग्राम वर, नाहीतर ज्यांना माहितीय ते कुठूनतरी टोरंट ची जुळनां करतायतच म्हणा, आन जर हे लॉकडाउन नसलं असतं तर एकमेकांकडून पिक्चर मागून मागून करून भागवलं असतं. पण आता बाहीरपण जाता येत न्हाय आणि चायनीज बंद केल्यामुळं shareit पण काढून टाकलं आसल.
तर या सगळ्यांला उत्तर म्हणून आजकाल OTT… OTT… असं लय ऐकायला मिळतंय…
तर हि काय आभाळातून पडलेली गोष्ट नाही मित्रांनो, चला तर मग सांगतो हि OTT म्हणजे भानगड हाय ते..
तर OTT म्हणजे ओव्हर-द-टॉप (वरच्यावर आसा अर्थ होत न्हाई!!),
इस्कटून सांगायचं झालं तर असल्या गोष्टी ज्या आपल्याला सरळ इंटरनेट वरून बघता, वाचता नायतर ऐकता येतात, ज्यावर कुण्या एका माणसाची नायतर संस्थेची मक्तेदारी नसती.
एक उदाहरण सांगतो,
Youtube!!, व्हय हे सुद्धा एक OTT प्लॅटफॉर्मच हाय. जिथं एखांद्याला एखादा व्हिडिओ टाकायचा आसल तर तो टाकतो, आणि ज्येला तो बघायचा आसल त्यो Youtube च्या अनुप्रयोगानं (अँप्लिकेशन ला मराठीत अनुप्रयोग म्हणत्यात लेकांनो, हायसा कुटं!! 😉 ) त्यो व्हिडिओ बघतो. जर तुमच्याकडं इंटरनेट आसल तर युट्युब वरचा कुठलाबी व्हिडिओ तुम्ही बघू शकता.
तर ढोबळमानानं ह्याचं ३ वाटं हायेत
- व्हिडिओ (चलचित्र)
- ऑडिओ (ध्वनिफीत)
- मेसेजिंग (संदेश)
व्हिडिओ OTT
ह्यात हॉटस्टार,एमएक्स प्ल्येअर, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि असलं आणि लय काय काय येतंय.
(त्या तसल्या साईट, व्हय व्हय त्याच ज्या सरकारनं बंद केल्यात तरी ज्याच्या पुढं २,३ लावून बघतात ना त्या पण ह्यातच येतेत)
ऑडिओ OTT
ह्याच्यामधे गाना, जिओसावन, स्काईप आसलं अजून बरंच काय हाय.
मेसेजिंग OTT
ह्यात तुम्ही ते रातरात भर चॅटिंग करता ना ते वॉट्सअँप, हाईक असले अनुप्रयोग येतेत..
आता ह्यातले काही फुकट हायेत आणि बाकीच्याना पैसं पडत्येत, ज्याला परवडतं त्यो घेतो ज्याला नाही परवडत त्यो दुसऱ्यांकडून युजरनेम पासवर्ड मागतो.
हाय कि नाय सोप्पं!! तुम्ही कायबी इचारा इस्कटून सांगायला मी हायेच!!