“पावसाचा निबंध” – पैकीच्या पैकी गुण देता येण्याजोगा लघुपट

0
979

खरंतर गोष्टीची मजा तेंव्हाच येते जेंव्हा सांगणारा ती तेवढ्याच मनोरमपणे आणि दृक्श्राव्य पद्धतीने तुम्हाला सांगतो. आधी जेंव्हा मी शाळेत होतो तेंव्हा गावी सतत वीज जायची, आणि ती जर रात्री गेलेली असली तर आम्हा सगळ्यांचा एकच विरंगुळा तो म्हणजे गोळा होऊन आपल्याला जमतील त्या गोष्टी सांगणं, सगळ्यांनाच खूप उत्तम गोष्टी सांगता येत होत्या असं नाही ज्याला जशी जमेल तशी तो गोष्ट सांगायचा, पण त्यातला एखादाच असा असायचा ज्याची गोष्ट कशीही असो कितीही वेळेला ऐकलेली असो पण जेंव्हा जेंव्हा तो गोष्ट सांगतो तेंव्हा तेंव्हा त्या गोष्टीचे नवे नवे पैलू कळत जायचे.  

हे एवढं याचसाठी सांगितलं कि तो जो गोष्ट सांगणारा असायचा ना त्याच्यात आणि नागराज मंजुळेंमध्ये मला खुप साधर्म्य वाटतं. 

नुकताच एका OTT प्लॅटफॉर्मवर नागराज मंजुळेंचा एक लघुपट पाहिला, “पावसाचा निबंध

मुळात तुम्ही जर ग्रामीण भागातलं आयुष्य अनुभवलं असेल तर यातली प्रत्येक फ्रेम तुमच्या अंगावर येईल, तुम्हाला वाटेल अरे हे तर मी बघितलंय, हे माझ्या सोबतही झालंय. म्हणजेच हा लघुपट पाहताना तुम्ही तिथं त्रयस्थ राहत नाहीत, त्यातलाच एक भाग होऊन जाता.

इथं जेंव्हा ह्या पावसाच्या निबंधाची गोष्ट सांगितली जाते तेंव्हा ती प्रत्येकाची गोष्ट वेगवेगळी असू शकते,
सांगणाऱ्याचा पाहणाऱ्यांच्या दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो, हेच सगळं ह्या गोष्टीतून इतक्या सहजसोप्या पद्धतीनं सांगितलं गेलंय, कि हि गोष्ट तुमच्या आतपर्यंत पोहोचेल यात शंका नाही.

यातलं गोष्टींच्या अंगानं काही सांगू नये, पाहणाऱ्याला ते आपणंहुन समजून घ्यावं असं वाटलेलं, पण राहवत नाही म्हणून काही गोष्टींचा जाणून बुजून उल्लेख करतोय.इथं गोष्ट हि काही प्रतीकात्मक चित्रणातून तुमच्या समोर येत राहते.

एक फ्रेम बघा कशी आहे, घरचा कर्ता पुरुष दारू पिऊन निश्चल पडलेला, त्या दोन मुलांची आई दुसऱ्यांची जनावरं राखून घर चालवणारी, ती जेंव्हा पैसे मागायला एकाच्या घरी जाते तेंव्हा एक मुलगी अभ्यास करत बसलेली असते, बाहेर सतत पाऊस पडत असतोच, हि फ्रेम डोक्यात ठेवायची आणि अजून एका फ्रेमशी जोडून बघायचं, जेंव्हा शाळेत सगळे आपापले निबंध वाचून दाखवत असतात तेंव्हा मघाशी म्हणालो तसाच प्रत्येकानं पाहिलेला पाऊस वेगळा असतो तो कितपत वेगळा  असतो ते या दोन फ्रेम बघून लक्षत येत.

अजून एक फ्रेम आहे जिथं सगळे निबंध वाचत असतात, निबंध न लिहिल्यामुळं ह्या कथेचं पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा दिलेली असते आणि कॅमेरा फिरत असताना फळ्यावरचा सुविचार दिसतो ”अनुभव हाच खरा शिक्षक”, अशी एक ना अनेक प्रतीकं तुम्हाला हा लघुपट पाहताना अनुभवता येतील.

गोष्टी सांगायची कला किंवा असं म्हणू गोष्टी ऐकणाऱ्यांची आणि बघणाऱ्यांची नस नागराज मंजुळेना गवसलीय असं म्हणू शकतो आणि त्याचबरोबर ह्याच्या जोडीला असणारं छायाचित्रण आणि ध्वनिमुद्रण(ज्याला Background Score म्हणतात) हे इतकं भन्नाट जमून आलाय कि हा लघुपट तुम्हाला खूप जवळचा वाटायला लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here