तात्या: ऐ येश्या आरं लगा आसं तोंडाला बांधून कुठं रं चाललाईस, यी की गड्या वाईचं बस जरा.
यशवंत: नाय तात्या टाटर पडायलाय सारखं मोटर बंद करून येतो जरा, जळायची नायतर.
तात्या: कशाला जळतीय तवा. त्ये पाटलाचं सुन्या जाईल आता त्येला सांग बंद करायला.
यशवंत: त्यो काय निघायचा न्हाय आता घरातनं, बायकू सोडायची न्हाय त्येला आता.
तात्या: ती काय पदराला बांधून ठिवती कि काय त्येला.
यशवंत: आव ती बचत गटात हाय, सुधरलीय जरा. बरं वाईट कळतंय तिला. ती जाऊदे, आता तुम्ही बी असं बसू नगासा, नायतर तर ते पोलीस आणि पोलीस पाटील आले ना कि मग धोतार कुठं अन आंगी कुठं असं व्हायचं.
तात्या : त्यांचा बा याव लागल कि..
यशवंत: त्यांचा बा काढू नागासा तात्या, तुमच्या भल्यासाठीच करायलेत ते.
तात्या: लोकांना हाणून काय भलं हुणारे?
यशवंत: ते कळल नंतर, आता तुमी बसलाय दुपारी पालथं झोपाव लागलं ना तवा.
तात्या: हि सगळं, कोण ती फारेनातनं करूणा आलीय तिच्या मुळं करायलेत ना?? हि पांढरी लोकं कुटनं कुटनं चेटूक करून येतील काय सांगाता येत नाही गड्या.
यशवंत: तात्या हि कुठली बाई-बीई न्हाय, रोग हाय त्यो रोग. कोरोना म्हणत्यात त्येला, चीनमधनं आलाय.
तात्या : कसला रोग अन गिग, आर त्या तसल्या भाहत्तर च्या दुस्काळात अन पिलगाच्या रोगातनं वाचलेला हाय ह्यो तात्या.
यशवंत: (स्वगतः) मग हितं ईकेट पडती दिसतंय.
तात्या: काय म्हणला??
यशवंत: तिथनं वाचला असाल, पर हितं काय सांगता येत न्हाई. कुणाला ह्यो रोग असलं त्येनं नुसतं ख्या ख्या, जरी केलं न्हायतरी त्यो जर निसता शिकला तुमच्याजवळ तरी ह्यो रोग हुतो तुम्हाला, आणि तुम्हाला झाला कि तुमच्यामुळ तुमच्या घरच्यांना हुईल. आणि ह्यो एकदा झाला कि म्हातारी माणसच लवकर जय हरी इठ्ठल म्हणत्येत.
आव काय तात्या राती तासल्या पाणचट मालिका बघायच्या परीस वाईच बातम्या ऐकत जावा कळल मग. जगात दुनियाची माणसं मरायला लाग्लीयात, सगळ्या देशानं स्वताला घरात कोंडून घेतलय, अन तुम्ही बसा हितं.
तात्या: आयला त्या बारीक डोळ्या वाल्यांच्या, लैच इस्कुट केलाय कि त्यांनी.
यशवंत: त्यांची काशी करुदे, तुम्ही घरात बसा न्हायतर, तुमच्या लेकाला घरात भजन ठेवावं लागलं, अन त्येला बी कुणी यायचं न्हाय.
तात्या: व्हय बाबा, बसतो घरीच. तरीच सकाळी ती कदमांची न्यानदा घरी बसा म्हून संगत हुती ऐकलं न्हायी. आता बसतो बाबा गप गुमान घरी.
तू बी जा बाबा लवकर मोटर बंद करून.