जमावबंदी आणि संचारबंदी दोन्ही वेगळ्यायत मित्रानो…

0
496

मित्रानो, जमावबंदी आणि संचारबंदी हे शब्द तुम्ही सतत ऐकताच असाल, आजकाल तर जास्तच.
पण हे दोन्ही शब्द सारखेच आहेत का? कि दोन्ही वेगवेगळे आहेत असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका,
मस्तपैकी अर्धाकप चहा घ्या, आणि वाचत राहा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील.

जमावबंदी

कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये, दंगल, हिंसाचार संभव तसेच मानवी जीवाला आणि आरोग्याला धोका असल्यास यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश जारी केले जातात.

 • नोटीस काढून कुठल्याही व्यक्तीला काही कृत्य करण्यापासून रोखण्यात येते.
 • या प्रकारच्या नोटिसा या विशिष्ट भागात राहणाऱ्या व्यक्ती किंवा त्या भागात जाणाऱ्या लोकांना बजाविण्याची तरतूद आहे. कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) १९७३ मधील असून, ते सुरक्षितता म्हणून लागू केले जाते.
 • जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी देतात.
 • जमावबंदी लागू झाली असल्यास एखाद्या परिसरातील शांतता भंग होऊ नये, यासाठी चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास  मज्जाव केला जातो.
 • जमावबंदीचा आदेश हा दोन महिन्यांपर्यंत असतो. दोन महिन्यांचा कालावधी संपल्यास पुन्हा हा कालावधी वाढविला जातो.

संचारबंदी

संचारबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लावले जातात. त्यास ‘कर्फ्यू’ असेही म्हटले जाते.

 • कलम १४४ मधील तरतुदीनुसार जमावबंदी आणि संचारबंदी लागू होते.
 • संचारबंदी लागू झाल्यास निवडण्यात आलेली ठिकाणे किंवा परिसरात नागरिकांना बाहेर पडता येणार नाही.
 • दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात येत असते.
 • आपत्कालीन परिस्थितीतही त्याचा वापर करण्यात येतो.
 • संचारबंदी लागू होताच सर्व अधिकारी जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांकडे येतात.
 • कलम १४४ मध्ये कर्फ्यू लावण्याची तरतूद आहे. याचं उल्लंघन केल्यास कारवाई होते. नियम मोडल्यास कोणालाही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना  असतात.
 • संचारबंदी लागताच जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची पूर्ण मुभा मिळते. याकाळात कोणीही घराहेर पडू शकत नाही.
 • बँका बंद राहतात. किराणाची दुकानंही बंद केली जातात. दूध आणि भाजीपाला विकण्यावर बंद असते. हॉटेलही बंद ठेवावे लागतात. (संचारबंदी) कर्फ्यूचा अर्थ सर्वकाही बंद आहे. रस्त्यावर केवळ प्रशासन आणि पोलीस कर्मचारीच दिसतात. रुग्णालय वगळता सर्व आवश्यक सुविधाही बंद केल्या जातात. (सध्या बाकी सर्व आवश्यक सुविधा चलू ठेवण्यात आल्या आहेत.)

शिक्षा:

 • कलम १४४ चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते.
 • कलम १०७ किंवा कलम १५१ अंतर्गत ही अटक करता येते.
 • कलम १४४ अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी देशात साथीचे रोग नियंत्रण अधिनियम १८९७ (Epidemic diseases act, 1897) लागू करण्यात आला आहे. एखाद्या रोगाला आळा घालण्याचे प्रयत्न हतबल होत असल्यास हा कायदा लागू करण्याची तरतूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here