घड्याळ्यांच्या चित्रात १० वाजून १० मिनिटचं झालेली का दिसतात?

0
1646

मित्रांनो , घड्याळ तर आपल्या सगळ्या जवळंच असतंय. कुणी काट्यांची घड्याळं, कुणी बिनकाट्यांची, कुणी वाळूची, कुणी पाण्याची, कुणी दिवस असताना उन्हाची आणि रात्री वेगवेगळ्या चांदण्या नायतर चांदण्यांच्या झुपक्यांवरून वेळ सांगणारी घड्याळं, माणसा सारखीच त्यांची प्रकारपण बदलतेत म्हणा. तर ह्यात घड्याळ कोणतंपण असो वेळ कळणं महत्वाचं, (कारण कुणावर वेळ कधी सांगून येत नसते बाबानो!!).

पण जवा तुमी आजकालची काट्यांची घड्याळं घ्यायला जाता, घड्याळाची चित्रं नायतर जाहिराती बघता तवा एक गोष्ट तुमच्या ध्यानात येती का ओ?

कि काही अपवाद सोडले तर जवळपास सगळ्या घड्याळ्यांमध्ये १० वाजून १० मिंट झालेली असतेत. मग म्हणलं जसं आपल्याला हा प्रश्न पडलाय तसा बाकीच्यांना पण पडला असलच कि, मग काय आमच्यातली किडं गप बसू देतेत व्हय, झाली आमची शोध मोहीम सुरु. 

मग जवा लय चित्रं बघिटली तवा एक गोष्ट ध्यानात आली कि खरंतर काही घड्याळांमध्ये १० वाजून ८ मिंट असतेत, काहींमध्ये १० वाजून १० मिंट झालेली असतेत, तर काहींमध्ये १० वाजून १२ मिंट असतेत. पण आपण लांबवुन बघिटलं तर आपल्याला १० वाजून १० मिंटंच झालेली दिसतील. ती तुमच्या डोळ्यांची चूक नसती त्यो मेंदूचा लोच्या असतोय(त्यो लोच्या काय असतोय त्ये सांगीन नंतर कधीतरी, आता घड्याळांवर फोकस करू).  

तर ह्येच्यावर लय वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातेत, आपल्याकडे असतेत ना काही बुद्धिवादी(मीच लय शहाणा म्हणणारे) जे आपल्याला फायजे तशे अर्थ लावून आपल्या सोयीनं सिद्धांत मांडायला तयार, तसंच ह्यावरपण येगयेगळं सिद्धांत मांडलं  गेल्यात. तीच बघू आता. 

त्यातलाच एक म्हणजे ह्या घड्याळाचा शोध लावणाऱ्याचा जन्म नायतर मृत्यू नायतर  त्येचा “युरेका” म्हणजेच त्त्येला घड्याळाचा शोध लागला  ती वेळ,  खरतर ह्या गोष्टींमध्ये खरं वाटण्याजोगं काहीच न्हायी, कारण आज आपण जी घड्याळ बघतोय ना त्येचा शोध लागला तेंव्हा तसंच होतं  का तर न्हायी कारण घड्याळाचं आजचं जे रूप हाय त्यासाठी कुणी एकटा  जबाबदार हाये असा म्हणता येनार न्हायी. 

कारण १६५६ मध्ये “क्रिस्टियान ह्युजेन्स” न जे कालमापन यंत्र तवाचं घड्याळच म्हणा ना तर तवापासून आजच्या हातावर बांधता यील अशा घड्याळापतूरच्या उत्क्रांतीमध्ये फक्त कुण्या एकट्याचा हात हाय असं आपण म्हणू शकत न्हायी. म्हणून ह्या सिद्धांताला आग्नेय स्वाहा: करून टाकू.

आजून एक असलाच सिद्धांत सांगत्येत त्यो म्हणजे त्या अमेरिकेचे आधीचे राष्ट्राध्यक्ष “अब्राहाम लिंकन” आणि ते  “जे एफ केनेडी” त्येंची हत्येची जी वेळ हाय ना त्या मुळं घड्याळांना हि वेळ दिलेलीय नायतर आफ्रिकन-अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतीलं प्रमुख नेतं  “मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर”(गांधीबाबांना लय मानायचा ह्यो माणूस) ह्येच्या हत्येची ती वेळ हाय अस म्हणत्येत,

तसं बघिटलं तर यासगळ्यांच्या हत्येच्या वेळा वेगवेगळ्या होत्या म्हणून ह्यो सिद्धांतही आग्नेय स्वाहा: व्हतो. 

अजून एक सिद्धांत हाय त्यो म्हणजे दुसऱ्या म्हायुद्धातला म्हणजी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर  ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ ला जे अनुहल्ले (‘लिटल बॉय’ अन ‘फॅट मॅन’ अशी त्या बॉम्बची नावं)केले त्याची वेळ म्हणून घड्याळाचे काटे तशे असत्येत, तर त्यातपण काय तथ्य दिसत न्हाय राव कारण दोन्ही अनुहल्ल्याची वेळ हि वेगवेगळी व्हती. त्यामुळं हे पण काय खरं वाटत न्हाय गड्या. 

अन त्येलाच धरून काही जण असही म्हणतेत कि दुसऱ्या म्हायुद्धच्या जिंकल्यामुळं इंग्रजी “Victory” मधला V म्हणून घड्याळाची वेळ हि V सारखी दाखवतेत. हे खरं पण असू शकतं बरंका, पण ह्येला खरं म्हणता यील असं काही ठोस पुरावंच न्हाईत त्येच्यामुळं ह्यो सिद्धांत थोडा तळ्यात मळ्यात करणारा हाय.

पण बऱ्याच लोकांना असंपण वाटतं कि आता जी १० वाजून १० मिनिटं हि घड्याळात दिसतेत ती सममितीय(symmetric!! गणितातला शब्दाय, घ्या समजून!!) हाय आणि ती बघण्याराला डोळ्याला बरं वाटतं म्हणून ती तशी दाखवलेत नायतर काही जण म्हणतेत कि घड्याळ उत्पादन संस्थेची चिन्ह(आपल्याकडचं घड्याळ नाही बरंका!!) घड्याळात वरच्या किंव्हा खालच्या बाजूला असते ती दिसावी म्हणून हि असली रचना केलीली असती,अन एक आनंदी चेहरा पण तसाच दिसतो म्हणून पण ते तसं असल असं काही जण म्हणतायेत. 

ह्यात काही संस्था अशा हायेत ज्यांची चिन्ह हि १० वाजून १० मिनिटाच्या च्या उलट म्हणजे ८ वाजून २० मिंट म्हणजे उलटा (V) असपण ठेवतेत. 

ह्यातले निम्म्याच्यावर घड्याळ उत्पादक किंवा जाहिराती करणारे ह्याचसाठी ती रचना ठेवतेत कि लय लोकांनी हि ठेवलीय म्हणजे यात काही तरी गोम नक्कीच असणार तर आपणही तीच ठेवावी(म्हणजे आपल्याकडं त्येनं केलं म्हणून आपण पण करायचं) म्हणजेच लोकं जातेत तिकडंच चला. 

तर हे झाले असले सिद्धांत आता ह्यातलं खरं काय नि खोटं काय हे शपथेवर कुणीपण सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला जे पटतंय ते आपण घ्यायचं अन नाहीच पटलं तर द्यायचा असलाच एखादा सिद्धांत ठोकून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here